नमस्कार महाराष्ट्र!!
‘माहितीदूत Mahitidoot’ या Blog मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत!!
मित्रांनो!! सुरुवातीलाच ‘Team माहितीदूत Mahitidoot’ तुमच्यासाठी घेऊन येत आहे महाराष्ट्राचे लोकनेते, देशव्यापी नेतृत्व शरद पवार यांची राजकीय आत्मकथा असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचा Review म्हणजे पुस्तक परिचय!
पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने गौरविलेल्या पवार साहेबांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या पंचावन्न वर्षाच्या राजकीय जीवनाचा हा ओघवता आढावा घेतला आहे पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने!! २०१५ साली प्रकाशित झालेल्या या ३५४ पानांच्या पुस्तकात साहेबांची आभाळाएवढी कारकीर्द मावणे तसे कठीण काम! मात्र हा यशस्वी प्रयत्न वाचकांना अतिशय भावला असून सद्यस्थितीतील trending book म्हणून याचा गौरव होत आहे! गेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण सहभाग असणाऱ्या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध म्हणजे हे पुस्तक होय!
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार,क्रीडा, कृषी इ. क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने प्रभाव पाडणारे, यशवंतराव चव्हाण यांचे बोट धरून राजकीय कारकीर्द सुरु करणारे व पुढे महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ते देशाचे विविध खात्याचे मंत्रीपद सांभाळणारे, लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविणारे, महिला सक्षमीकरण, आपत्ती व्यवस्थापन, कृषी क्षेत्र इ. क्षेत्रात कार्यकर्तृत्व गाजवणारे, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संकटातूनही लिलया बाहेर पडणारे, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रयोगशील, पुरोगामी, सुसंस्कृत, शालीन असलेले आणि ‘राजकारणातील चाणक्य’ म्हणजे शरद पवार! आणि त्यांची राजकीय आत्मकथा असलेले हे पुस्तक म्हणजे ‘लोक माझे सांगाती’!
“कसोटीच्या क्षणी सामुदायिक शहाणपणाच दर्शन घडवणाऱ्या, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रत्येक भारतीयास विनम्र सादर!” अस म्हणत अवघ्या रयतेस पुस्तक अर्पण करत सुरुवातीलाच या जाणत्या राजाने आपल्या राजकीय लोकनेते पणाची झलक दाखवून दिली आहे.
‘शेकाप’ च्या विचारांकडे कल असलेली आई व कडक शिस्तीचे वडील! त्यामुळे सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतलेल्या सर्वांनीच पुढे आपापल्या क्षेत्रात उतुंग भरारी घेतली. पवार साहेब ही याला अपवाद झाले नाहीत! सामाजिक आणि राजकीय बाळकडू घरातूनच मिळालेल्या या युवकाने पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे गाठले आणि तिथेच त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार मिळाला. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून समवयस्क मित्रांच्या मदतीने राजकीय क्षेत्रात प्रवेश झालेल्या पवारांच्या दैदिप्यमान कारकिर्तीचा आढावा हे पुस्तक घेते. पुण्यात महाविद्यालयीन जीवनात कार्यरत असताना संयुक्त महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांचा परीसस्पर्श त्यांना झाला आणि पुढे आयुष्यभर त्यांना गुरुस्थानी मानून त्यांनी राजकीय वाटचाल केली.
पुढे सर्वात तरुण आमदार ते महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून अवघ्या १० ते ११ वर्षांच्या विधिमंडळीय वाटचालीतील या अविश्वसनीय यशाचा अतिशय नाट्यमय मात्र तितकाच थक्क करणारा प्रवास हे पुस्तक वाचताना जाणवतो!
पुलोद प्रयोगानंतरचे राजकारण, पुढे विरोधी पक्ष म्हणून ground level वर केलेले काम, राजीव गांधींच्या आग्रहास्तव स्वगृही परतून राज्य आणि देशपातळीवर केलेले नेतृत्व, पुन्हा महाराष्ट्रात परतून राज्यावर आलेल्या विविध संकटांचे केलेले आपत्ती व्यवस्थापन, देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेता, गांधी घराण्याशी वैचारिक मतभेदांमुळे पुन्हा पक्ष त्यागून राष्ट्रवादीची स्थापना व पुन्हा आघाडी करून राज्यात तसेच केंद्रातील सत्तेमधील सहभाग, जगाला हेवा वाटावा असं १० वर्ष सांभाळलेलं केंद्रीय कृषिमंत्रीपद इ. राजकीय वळणाचा थरारक अनुभव वाचताना वाचक हरखून जातो!
ही राजकीय आत्मकथा वाचताना जाणवते की साहेब फकत राजकारणातच रमले असे नाही तर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा इ. क्षेत्रामध्ये ही त्यांनी आपले कर्तृत्व दाखवले. विद्या प्रतिष्ठान, माळेगाव कॅम्पस इ. ठिकाणी विविध शैक्षणिक प्रयोग राबवून बारामती आणि ग्रामीण भागातील शेतकरी मुलांना शैक्षणिक दालन खुले करून दिले. तसेच वडीलबंधू अप्पासाहेब यांचे मदतीने कृषी क्षेत्रामध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करून शेतकऱ्यांचे मार्गदर्शक बनले. सहकार तर साहेबांचा आवडता विषय! सहकारी चळवळीला मजबुती करणासाठी अनेक उपाययोजना त्यांनी आखल्या. क्रीडा क्षेत्रातही साहेबांचा मुक्त संचार दिसून येतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद असो की IPL ची सुरुवात! की कबड्डी खो-खो या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून द्यायचे असो! यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की साहेबांनी या क्षेत्रामध्ये राजकारण येऊ दिले नाही!
साहेबांच्या कारकिर्दीतील एक विशेष गोष्ट वाचकांच्या लक्षात येते, ती म्हणजे साहेबांचे आपत्ती व्यवस्थापन! मुंबईचा बॉम्बस्फोट, किल्लारी लातूरचा भूकंप, मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्न, अशांत पंजाब शांत करण्यासाठी केलेली मध्यस्थी, विरोधी पक्षात असून ही तत्कालीन पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांच्या विनंतीवरून २००१ साली गुजरात भूकंपानंतर स्वीकारलेली जबाबदारी यामधे साहेबांच्या नियोजनपूर्वक कामाचा गौरव अवघ्या देशाने केला.
ही राजकीय वाटचाल चालत असताना वाटेवर आलेल्या काट्यांविषयीही या पुस्तकामध्ये भाष्य केले आहे. विशेषतः राजकीय विश्वासार्हतेविषयीच्या प्रश्नावर त्यांनी पुलोद प्रयोग, समाजवादी काँग्रेस, स्वगृही परतणे, राष्ट्रवादी स्थापना, पुन्हा आघाडी ई. विषयी बाजू मांडली आहे.
राजकीय जीवनात वावरत असताना त्याचा वैयक्तिक संबंधावर परिणाम होणार नाही याची त्यांनी नेहमीच दक्षता घेतलेली दिसून येते. राजकीय विरोधक असूनही बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयी इ. विषयीही या पुस्तकात लिहिले गेले आहे. एवढेच काय तर नेहमीचे साथीदार अगदी ड्रायव्हर ‘गामा’ यावरही केलेले भाष्य वाचताना आपण कधी पवारमय होऊन जातो कळतच नाही ! सकारात्मकता, प्रचंड आशावाद , निरंतर कार्यमग्नता, कमालीचा संयमीपना यामुळे राजकीय जीवनामध्ये जसे वादळे आली आणि त्यांनी खंबीरपणे त्यावर मात केली, तितक्याच खंबीरपने त्यांनी वैयक्तिक जीवनातील संकटांवरही मात केली! म्हणूनच कोणीच त्यांना ना राजकीय जीवनात हरवू शकले ना वैयक्तिक जीवनात! अगदी कर्करोगालाही त्यांनी हरवून दाखवले.
अश्या या सरळ, साध्या मात्र ओघवत्या शैलीतील राजकीय आत्मकथेच्या समारोपाप्रसंगी पवार साहेब म्हणतात –
“सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ठ आहे. देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे. हा सर्वसामान्य भारतीय माणूस भारतातील सर्व राजकारण्यांपेक्षा खूपच शहाणा आणि समजूदार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय तो घेतो. काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत जनतेच एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येते. हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. साऱ्या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचा मी आपल्या साडेपाच दशकांच्या सार्वजनिक जीवनात काम करताना वारंवार अनुभव घेतला आहे. या जनतेचा विश्वास मला पंचावन्न वर्ष लाभला, यापेक्षा अधिक काय असू शकत?”
-शरदचंद्र गोविंद पवार
अथांग सागराप्रमाणे असलेली पंचावन्न वर्षांची राजकीय कारकीर्द ३५४ पानांमध्ये मांडणे तसे महाकठीण काम! तरीदेखील वाचकाला ‘पवारमय’ करून टाकणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असेच आहे!
धन्यवाद!!
‘Team माहितीदूत Mahitidoot’!!